रायगड: रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीमधील रोहन केमिकल्स कंपनीतून जप्त करण्यात आलेल्या 88 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणी कंपनीचा मालक रोहन प्रभाकर गवस याला मालाड, मुंबई येथून पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे कंपनी मालकाची आणखी ‘कारनामे’ उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाड एमआयडीसीतील अनेक कंपन्याही या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. महाड एमआयडीसी पोलिस आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे पथक संयुक्तपणे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
महाड एमआयडीसी पोलिस आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, त्यांनी रोहन केमिकल्स कंपनीवर धाड टाकली होती. या धाडीत 34 किलो केटामाईन पावडर आणि 13 किलो लिक्विड केटामाईन असा एकूण 88 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी यापूर्वीच माछींद्र भोसले (रा. जिते-महाड), सुशांत पाटील (मोहप्रे-महाड) आणि शुभम सुतार (पागाव-करवीर, कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली होती.
या कारवाईनंतर रोहन केमिकल्स कंपनीचा मालक रोहन गवस फरार होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला मालाड, मुंबई येथून अटक केली आहे. या कंपनी मालकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. ड्रग्ज प्रकरणाचे नेमके ‘कनेक्शन’ शोधून काढण्यासाठी महाड एमआयडीसी पोलिसांनी कंबर कसली आहे. या ड्रग्ज प्रकरणात एमआयडीसीतील अन्य छोट्या-मोठ्या कंपन्यांचाही सहभाग असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्या दृष्टीने सर्व शक्यता पडताळल्या जात आहेत.