पालघर: यंदा १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या नव्या मासेमारी हंगामात इतर माशांचे उत्पादन समाधानकारक असले तरी राज्य मासा म्हणून घोषित केलेला चवदार चंदेरी पापलेट (सरंगा) मात्र जाळ्यात सापडेनासा झाला आहे.
बंदी असूनही पापलेटच्या पिलांची सर्रास मासेमारी सुरू असल्याने या प्रजातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पालघर किनारपट्टीवरील काही भागांत १०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे पापलेट बिनदिक्कत पकडले जात आहेत. मोठ्या ट्रॉलर्समधून जाळ्यात अडकलेले हे लहान मासे सोडले न जाता थेट विक्रीसाठी नेले जात आहेत. परिणामी, सरंग्याची संख्या झपाट्याने कमी होत असून किनाऱ्याजवळ सहज मिळणारा पापलेट आता १०० नॉटिकल मैलांवर गेला आहे.
पालघर, वसई, सातपाटी, अर्नाळा व डहाणू बंदरांमध्ये बैठक घेऊन जनजागृती सुरू आहे. बंदी असूनही लहान पापलेट पकडताना आढळल्यास पाचपट दंड आकारला जाणार असून दंडाची रक्कम १ लाख ते ५ लाखांपर्यंत जाईल. आतापर्यंत दोन बोटींवर कारवाई झाल्याचे मत्स्य अधिकारी निलेश पाटील यांनी सांगितले. १५ सप्टेंबरनंतर पोस्टर व बॅनरद्वारे व्यापक जनजागृती होणार आहे.
पापलेटचे वजनानुसार वर्गीकरण होते. ५०० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या सुपर सरंगा ला सर्वाधिक मागणी असते. मात्र लहान पिलांची मासेमारी सुरू राहिल्यास भविष्यात हा दर्जेदार पापलेट बाजारातून हद्दपार होईल, अशी भीती मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
आकडेवारी धोकादायक…
१९८८ मध्ये राज्यात पापलेटचे उत्पादन सुमारे १२ हजार टन होते.
२०२२ मध्ये उत्पादन पाच हजार टनांखाली घसरले.
सातपाटी सहकारी संस्थांच्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये अवघे १२६ टन पापलेट मिळाले.
“जिल्ह्यातील कारवाई सुरू असून लहान मासे विक्री करताना आढळल्यास सागरी कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल.”
– दिनेश पाटील, मत्स्यव्यवसाय अधिकारी, पालघर
सातपाटीचा सरंगा गायब होतोय! पापलेटच्या पिलांच्या मासेमारीवरून मच्छीमारांची चिंता






