रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची धग; पहिला टँकर धावला

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच रत्नागिरी जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत असून, या हंगामातील पहिला पाणीपुरवठा टँकर अखेर रत्नागिरी तालुक्यात धावला आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे आणि मिऱ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाण्याची भीषण समस्या निर्माण झाल्याने तेथे दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात यंदा उन्हाचा तडाखा वाढल्याने पाणीपातळी खालावली असून, केवळ रत्नागिरीच नव्हे तर चिपळूण, खेड, राजापूर आणि लांजा या तालुक्यांमध्येही टंचाईची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.

या सर्व तालुक्यांमधील विविध गावांमधून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरू लागली असून, प्रशासकीय स्तरावर सध्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे ग्रामीण भागातील जलस्रोत आटू लागल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. येत्या काही दिवसांत टंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता असून, मागणीनुसार टँकरची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येईल, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत टँकर सुरू झाल्याने टंचाईग्रस्त ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी उर्वरित तालुक्यांमध्ये टँकर कधी पोहोचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *