रत्नागिरी: कोकणातील रत्नागिरी विभागातील अमूल्य आणि प्रागैतिहासिक वारसा असलेल्या कातळशिल्पांना जागतिक पटलावर नेण्यासाठी राज्य शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. या कातळशिल्पांच्या ऐतिहासिक आणि वैज्ञानिक महत्त्वाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास सांस्कृतिक कार्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असून, यासाठी १४.५० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. रत्नागिरी परिसरातील सुमारे ३०० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीपैकी २५ किलोमीटर क्षेत्रात २००० हून अधिक कातळशिल्पे आढळून आली असून, हा ठेवा मानवी संस्कृती आणि परंपरांचा उलगडा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत कातळशिल्पांचे विविध ऋतूंमध्ये, नैसर्गिक प्रकाशछटांमध्ये आणि स्थानिक लोकजीवनाशी असलेले त्यांचे नाते अधोरेखित करणारे चित्रीकरण केले जाणार आहे. माहितीपटाच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक उपकरणे, ड्रोन फुटेज, सिनेमॅटिक शॉट्स आणि उच्च-गुणवत्तेच्या छायाचित्रणाचा वापर केला जाईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडे सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा माहितीपट युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केला जाणार असून, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिग्दर्शकांची नियुक्ती केली जाणार आहे. या प्रकल्पातून केवळ माहितीपटच नव्हे, तर सोशल मीडियासाठी स्वतंत्र कंटेंट आणि एक समृद्ध ‘एव्ही कंटेंट बँक’ देखील उभारली जाणार आहे. या निर्णयामुळे कोकणातील या प्राचीन वैभवाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्यासोबतच स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मंत्री शेलार यांनी व्यक्त केला आहे.





