लोटे औद्योगिक वसाहतीत हवेच्या प्रदूषणाबाबत जनजागृती; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

खेड: ‘प्रोटेक्ट टुडे, सिक्योर टुमारो’ या उपक्रमांतर्गत हवेच्या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून लोटे येथील उद्योग भवन येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात हवेची गुणवत्ता आणि पर्यावरणीय कायदेशीर साक्षरता यावर उपस्थित मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. आर. आर. पाटील आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सचिन पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. सचिन पाटील यांनी हवेच्या प्रदूषणाची वाढती पातळी आणि त्याचे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम विशद केले. समुदायाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने प्रदूषण नियंत्रणात आपला सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सचिव आर. आर. पाटील यांनी पर्यावरणीय कायद्यांविषयी उपस्थितांना साक्षर केले. लोटे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सी.ई.टी.पी. अध्यक्षांनी औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांना प्रदूषणाबाबतचे मूलभूत ज्ञान आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांची माहिती अत्यंत सोप्या भाषेत दिली.

कार्यक्रमादरम्यान लोटे परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडताना सांगितले की, औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांकडून संध्याकाळच्या वेळी सोडला जाणारा धूर वातावरणात साठून राहतो, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चिपळूण क्षेत्रीय अधिकारी श्री. उत्कर्ष शिनगारे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींवर चर्चा केली.

या जनजागृती कार्यक्रमाला लोटे परिसरातील ग्रामस्थ, महाविद्यालयीन विद्यार्थी, अंगणवाडी सेविका तसेच विविध औद्योगिक कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हवेची खालावलेली गुणवत्ता आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा उहापोह या कार्यक्रमात करण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *