GRAMIN SEARCH BANNER

खेड-मंडणगड मार्गावर एसटी आणि दुचाकीच्या अपघातात मयत दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Gramin Varta
273 Views

खेड: तालुक्यातील मंडणगड ते खेड जाणाऱ्या मार्गावर भिलारे-आयनी येथील बारकोंबडा नदीच्या पुलावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेत दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एसटी चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात मयत दुचाकीस्वारावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मंडणगड आगाराची एसटी बस (एम.एच. १४, बी.टी. २९६४) घेऊन चालक जिग्नेश अर्जुन धनावडे (वय ४२, रा. महाड) हे आपल्या मार्गावरून जात होते. यावेळी बारकोंबडा नदीच्या पुलावर समोरून आलेल्या होंडा शाईन (एम.एच. ०८, एक्स ०८९५) दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटला. दुचाकीस्वार विलास गंगाराम कोपरे (वय ६३, रा. घेरापालगड, गावठाणवाडी, ता. खेड) यांनी आपली दुचाकी भरधाव वेगाने आणि हयगयीने चालवून एसटी बसला समोरून जोरात धडक दिली.

या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून दुचाकीस्वार विलास कोपरे हे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी एसटी चालक जिग्नेश धनावडे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याप्रकरणी मयत विलास कोपरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६, १२५ (अ) (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3200981
Share This Article