GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील १२ गावांतील ११४ वाड्यांचे सौर ऊर्जेद्वारे मोफत विद्युतीकरण

Gramin Varta
355 Views

“द सोलार मॅन ऑफ इंडिया” डॉ. सचिन यशवंत शिगवण यांचा महत्वाकांक्षी उपक्रम

निर्मिती फाउंडेशन व ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह प्रा. लि. मार्फत प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी

संदीप घाग / सावर्डे

चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांतील ग्रामीण भागात विकासाचा नवा उजेड पसरला आहे. ३१० सौर पथदिव्यांच्या स्थापनेद्वारे १२ गावांतील ११४ वाड्यांचे शाश्वत विद्युतीकरण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमामुळे हजारो ग्रामीण नागरिकांच्या जीवनात सुरक्षितता, प्रकाश आणि आत्मविश्वासाचा किरण उजळला आहे.

देशभरात “द सोलार मॅन ऑफ इंडिया” म्हणून ओळखले जाणारे डॉ. सचिन यशवंत शिगवण यांनी स्वखर्चातून हा प्रकल्प उभारून ग्रामीण विकासाला हातभार लावला आहे. TUV-SUD, निर्मिती फाउंडेशन आणि ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात आला असून, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होऊन १५ नोव्हेंबर २०२५ रोजी यशस्वीपणे पूर्ण झाला आहे.

या प्रकल्पांतर्गत चिपळूण तालुक्यातील मांडकी खुर्द, पालवण, आगवे, वीर, देवपाट, तोंडली, नायशी, वडेरु आणि पेढांबे ही गावे तसेच संगमेश्वर तालुक्यातील आंबव, नारडुवे आणि शिरंबे ही गावे सहभागी होती. ग्रीन इंडिया इनिशिएटिव्हच्या तांत्रिक टीमने प्रत्येक गावाचे सर्वेक्षण करून आवश्यक ठिकाणी सौर पथदिव्यांची स्थापना केली.

प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी श्रमदानाद्वारे सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने लोकसहभागातून साकारलेला विकासाचा नमुना ठरला आहे.

पूर्वी या गावांमध्ये रात्री अंधारामुळे असुरक्षित वातावरण होते. वनक्षेत्राच्या सान्निध्यात असल्याने वाघ, बिबट्या व इतर वन्य प्राण्यांच्या भीतीने ग्रामस्थ रात्री घराबाहेर पडत नसत. मात्र सौर पथदिव्यांच्या स्थापनेनंतर आता गावांमध्ये प्रकाशासह सुरक्षिततेची आणि आत्मनिर्भरतेची भावना रुजली आहे.

हा प्रकल्प केवळ वीजपुरवठ्याचा नव्हे, तर सुरक्षितता, आत्मनिर्भरता आणि शाश्वत विकासाचा किरण ठरला आहे. ग्रामीण भारतात हरित ऊर्जा आणि सामाजिक परिवर्तनाचे हे प्रेरणादायी उदाहरण म्हणून या प्रकल्पाची नोंद होईल, असा विश्वास ग्रामस्थ व आयोजक संस्थांनी व्यक्त केला आहे.

Total Visitor Counter

3200837
Share This Article