मुंबई: ऑक्टोबर २०२५ हा महिना सणांनी आणि उत्सवांनी भरलेला आहे. दसरा, दिवाळी, दुर्गा पुजा, छटपूजा अशा अनेक उत्सवांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका तब्बल १५ दिवस बंद राहणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी (RBI) जाहीर केलेल्या यादीप्रमाणे या महिन्यात राष्ट्रीय सुट्ट्या आणि प्रादेशिक सणांमुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.
याचा अर्थ असा की, जर तुम्हाला बँकेमध्ये कोणतेही व्यवहार करायचे असतील, तर त्याचे आधीच नियोजन करून पुढे पाऊल टाकावे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाईन बँकिंग, UPI, नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा मात्र नेहमीप्रमाणेच सुरू राहतील. पण प्रत्यक्ष बँक शाखेत जाऊन काम करणाऱ्यांसाठी हे सुट्टीचे दिवस अवघड ठरणार आहेत.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला दसरा, आयुधपूजा (विजयादशमी) आणि दुर्गा पूजेच्या निमित्ताने त्रिपुरा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, सिक्कीमसह अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. त्यानंतर २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असल्यामुळे संपूर्ण भारतात बँका बंद राहतील. ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी सिक्कीममध्ये दुर्गा पूजेच्या सुट्ट्या लागू होतील. ६ ऑक्टोबर रोजी त्रिपुरा व पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मीपूजनामुळे शाखा बंद राहतील.
७ ऑक्टोबरला कर्नाटक, ओडिशा, चंदिगड आणि हिमाचल प्रदेशात महर्षी वाल्मिकी जयंती तसेच कुमार पौर्णिमेनिमित्त बँका बंद राहतील. १० ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशात करवा चौथ निमित्त सुट्टी राहील. १८ ऑक्टोबर रोजी आसाममध्ये कोटी बिहू निमित्त बँक शाखा बंद राहतील.
दिवाळीमध्ये बँकांना सर्वाधिक सुट्ट्या आहेत. २० ऑक्टोबरपासून २३ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये दिवाळी, गोवर्धन पूजा, बाल प्रतिपदा, भाऊबीज आणि इतर सणांमुळे बँका बंद राहतील. २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी बिहार आणि झारखंड मध्ये छटपूजेच्या सुट्ट्या बँक पाळेल, आणि शेवटी, ३१ ऑक्टोबरला गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती साठी बँका बंद राहतील.
याशिवाय, प्रत्येक महिन्याप्रमाणेच ऑक्टोबरमध्ये ही दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका कामकाजासाठी बंद असतील. त्यामुळे या महिन्यात बँका एकूण १५ दिवस बंद राहणार आहेत. ऑक्टोबर महिन्यातील या लांबलचक सुट्ट्यांचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवर होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करायचे असतील, त्यांनी अगोदरच नियोजन करणं आवश्यक आहे.
बँकेची कामे लवकर उरकून घ्या! ऑक्टोबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार
