GRAMIN SEARCH BANNER

राज्यस्तरीय स्पर्धेत कसबा येथील विवान भांगेचे दैदिप्यमान यश; चॅम्पियन ट्रॉफीसह रौप्य पदकावर कोरले नाव

Gramin Varta
12 Views

संगमेश्वर (दिनेश अंब्रे): इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या १५ व्या राज्यस्तरीय शैक्षणिक स्पर्धेत कसबा येथील कु. विवान धनाजी भांगे याने आपल्या बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. विवानने या स्पर्धेत केवळ स्वतःची छाप पाडली नाही, तर आपल्या शाळेचे आणि कसबा परिसराचे नाव राज्यपातळीवर उज्ज्वल केले. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विवानने ‘चॅम्पियन’ किताब पटकावून विशेष गौरव प्राप्त केला. प्रश्नमंजुषा, बौद्धिक चाचण्या आणि स्मरणशक्तीवर आधारित विविध आव्हानात्मक उपक्रमांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.

याच सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या ‘ब्रेन डेव्हलपमेंट’ परीक्षेत विवानने रौप्य पदक (सिल्व्हर मेडल) मिळवून आपल्या बौद्धिक प्रगल्भतेचा ठसा उमटवला. वेग आणि अचूकता आवश्यक असलेल्या या परीक्षेत त्याने मिळवलेले यश विशेष मानले जात आहे. या यशाची मालिका पुढे सुरू ठेवत विवानने राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षेतही ९० टक्के गुण प्राप्त करून आपल्या अष्टपैलू अभ्यासाची चुणूक दाखवून दिली. एकाच वेळी तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश मिळवून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

विवान हा न्यू इंग्लिश स्कूल, कसबा येथील विद्यार्थी असून त्याच्या या यशात शाळेतील शिक्षिका सौ. अत्तार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच वडील धनाजी भांगे यांनी मुलाला दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि योग्य अभ्यासाच्या नियोजनामुळे हे यश साध्य करता आले असल्याचे विवानने सांगितले. विवानच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि पालकांकडून त्याचे कौतुक होत असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Total Visitor Counter

3229011
Share This Article