GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत एलईडीच्या सहाय्याने मासेमारीच्या तयारीत असणाऱ्या बोटीवर कारवाई

रत्नागिरी: समुद्रात प्रकाशाचा वापर करून अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून, मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान ‘भराडी प्रसन्न’ या नौकेवर मोठी कारवाई करण्यात आली. ३ एप्रिलच्या रात्री १०.८३ सागरी मैल अंतरावर एलईडी दिव्यांच्या साहाय्याने मासेमारी करण्याची तयारी सुरू असतानाच गस्तीवर असलेल्या पथकाने या नौकेला रंगेहात पकडले. ४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे बेकायदा मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी स्मिन्तल कांबळे व त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. मिऱ्या-काळबादेवी समुद्रात गस्त घालत असताना त्यांना एका नौकेच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. अधिक तपासणी केली असता, कैलास उल्हास कुबल यांच्या मालकीची ही नौका तांडेल आणि ५ खलाशांसह एलईडी दिवे व जनरेटर सज्ज ठेवून माशांना आकर्षित करत असल्याचे आढळले. पर्यावरणासाठी घातक असलेल्या या कृत्रिम प्रकाश पद्धतीचा वापर केल्याप्रकारणी पथकाने नौकेसह सर्व साहित्य तात्काळ जप्त केले.

जप्त केलेली ही नौका आणि जनरेटर सध्या मिरकरवाडा बंदरात कडक पहाऱ्यात ठेवण्यात आले आहेत. या मोहिमेत सुरक्षा रक्षक सुजन पोवार, अमोल पिलणकर, अनिकेत पवार आणि भूषण करमरकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. समुद्रातील जैवविविधता टिकवण्यासाठी यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र केल्या जातील, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.

Total Visitor Counter

3485444
Share This Article