चिपळूण: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मला सर्व काही मिळाले होते, असे असताना शरद पवार यांना सोडून मी मोठी चूक केली, अशी अत्यंत प्रांजल कबुली शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. आज कठीण प्रसंगात मी पवार साहेबांसोबत असायला हवा होतो, मात्र माझ्याकडून ती चूक झाली आणि आता पुन्हा तशीच चूक करायची नाही, म्हणूनच अडचणीच्या काळात मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण परिणामांची पर्वा न करता जे सत्य आहे तेच बोलणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी या रोखठोक मुलाखतीत केला.
यावेळी आमदार जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारसह भाजपवर कडाडून टीका केली. देशात कोरोनासारखी स्थिती पुन्हा उद्भवू शकते असे पंतप्रधान सांगत असताना, दुसरीकडे राज्यात कशाचाही तुटवडा नाही असे मुख्यमंत्री म्हणतात; मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप बंद असून एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारने आता रेशनवर केरोसिन देण्याचा निर्णय घेतल्याचा दाखला देत, राज्यात सर्व काही मुबलक आहे तर हा निर्णय का घ्यावा लागला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अफवा पसरवण्यात भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही, असा टोला लगावतानाच आजच्या परिस्थितीला नेहरूंना जबाबदार धरले नाही याबद्दल भाजपला धन्यवाद देतो, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.
२०१४ पासून देशात अंधश्रद्धेवर लोकांचा विश्वास वाढू लागला असून भोंदूगिरी आणि भगतगिरीला खतपाणी घातले जात असल्याचा गंभीर आरोपही जाधव यांनी केला. राजकारणी लोक सुद्धा बाबा-बुवांच्या मागे लागल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये चुकीचा संदेश जात असून, सत्तेचा मुकुट केवळ चमत्कारानेच मिळतो असा समज पसरत चालला आहे. राजकारण्यांच्या अशा वागण्यामुळेच समाजात अंधश्रद्धा बळावत असून अशोक खरात प्रकरण हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला.







