GRAMIN SEARCH BANNER

‘डिजीटल अरेस्ट’चा बनाव करून जयगड येथील सेवानिवृत्ताला २५ लाखांचा गंडा; नाशिक पोलीस असल्याचे सांगून केली फसवणूक

Gramin Varta
148 Views

जयगड: दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचे भासवून आणि ‘डिजीटल अरेस्ट’ची भीती दाखवून जयगड येथील एका सेवानिवृत्त व्यक्तीची २५ लाख २७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात तीन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर गुन्हेगारांनी रचलेल्या या जाळ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, जयगड साखरी बौद्धवाडी येथील रहिवासी सुधाकर लक्ष्मण जाधव (वय ६१) यांना १७ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत तीन अनोळखी इसमांनी वारंवार फोन केले. समोरच्या व्यक्तींनी आपण नाशिक पोलीस दलातून बोलत असल्याचे भासवले. तुमच्या नावावर असलेल्या बँक खात्यातून २ कोटी रुपयांचे ‘मनी लाँड्रिंग’ झाले असून तुमचा दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याची खोटी माहिती देऊन त्यांना जाळ्यात ओढले. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून तुम्हाला चौकशीसाठी हजर राहावे लागेल, असे सांगून त्यांना व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे ‘डिजीटल अरेस्ट’ राहण्यास भाग पाडले.

गुन्हेगारांनी जाधव यांचा विश्वास संपादन करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर पोलीस विभागाचा लोगो, त्यांचे नाव, आधार कार्ड क्रमांक आणि फोटो असलेले बनावट पत्र पाठवून त्यांना पूर्णपणे घाबरवून दिले. बँक खाते व्हेरीफाय करण्याच्या बहाण्याने आणि खात्यातील रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तपासणीसाठी जमा करावी लागेल असे सांगून, वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण २५ लाख २७ हजार रुपये भरण्यास त्यांना भाग पाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी जयगड पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3367956
Share This Article