GRAMIN SEARCH BANNER

जिल्ह्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात

Gramin Varta
13 Views

पावसाच्या लांबलेल्या कालावधीचा परिणाम; डिसेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी कासवांची उपस्थिती

दापोली : जिल्ह्यात ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झाली असून कांदळवन विभागाच्या वतीने आतापर्यंत ७२० कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. मागील वर्षी जिल्ह्यात तब्बल १ हजार ४१७ घरटी आढळून आली होती, तर त्यामधून ६२ हजार ७५८ पिल्लांचे यशस्वी जलार्पण करण्यात आले होते.

जिल्ह्यातील सात समुद्रकिनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातली असून, यावर्षी पावसाचा कालावधी लांबल्याने डिसेंबर महिन्यात अपेक्षित संख्येने कासवे किनाऱ्यावर आलेली नसल्याचा अंदाज वन व कांदळवन विभागाने व्यक्त केला आहे. कासव संवर्धनाच्या दृष्टीने रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वनविभाग व कांदळवन विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

पूर्वी कासवांच्या अंड्यांची तस्करी होत असल्याचे प्रकार घडत होते. काही ठिकाणी ही अंडी खाद्य म्हणून वापरली जात असल्याचेही निदर्शनास आले होते. मात्र सातत्यपूर्ण जनजागृती, स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि कासवमित्रांच्या सहकार्यामुळे कासव व त्यांच्या अंड्यांचे संरक्षण मोठ्या प्रमाणावर शक्य झाले आहे. तरीही हवामानातील बदल, मानवी हस्तक्षेप आणि समुद्रकिनाऱ्यांवरील वाढती वर्दळ यामुळे कासवांच्या अस्तित्वावर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कासवांच्या सुरक्षिततेसाठी किनाऱ्यावर आढळणारी अंडी जाळीत संरक्षित केली जात असून सुमारे ५५ दिवसांनंतर बाहेर पडणाऱ्या पिल्लांना कासवमित्रांच्या मदतीने सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात येते.
यावर्षी रेंगाळलेल्या पावसामुळे विणीचा हंगामही लांबला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंडणगड-वेळास येथे १ घरटे आढळून आले असून त्यामध्ये १२४ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. दापोली माड येथे १ घरटे व १०७ अंडी, गुहागर येथे २ घरटी व २४३ अंडी, रत्नागिरी वरवडे येथे १ घरटे व ९५ अंडी, वारे येथे १ घरटे व ९० अंडी, तर माडबन येथे १ घरटे व ९२ अंडी संरक्षित करण्यात आल्याची माहिती कांदळवन विभागाने दिली.

दरम्यान, सुमारे दहा वर्षांपूर्वी कोकण किनारपट्टीवरील कासवांचा विणीचा हंगाम नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरू होत असे. मात्र कालांतराने हवामानातील बदल आणि अन्य कारणांमुळे हा कालावधी पुढे सरकला आहे. गेल्या काही वर्षांत डिसेंबरमध्ये हंगामाची सुरुवात होत असली तरी मोठ्या प्रमाणावर कासवे अंडी घालण्यासाठी जानेवारीनंतरच किनाऱ्यावर येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अंड्यांतून पिल्ले बाहेर पडण्याचा कालावधीही लांबत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3366863
Share This Article