GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी: पानवल येथे भरधाव दुचाकी सिमेंट ब्लॉकवर आदळल्याने चालकाचा मृत्यू

Gramin Varta
191 Views

रत्नागिरी : रत्नागिरी-हातखंबा मार्गावर पानवल येथे झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. अतिवेगात असलेली दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट ब्लॉकवर जोरदार आदळल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयसूर्या शांताराम मांडवकर (वय २८, रा. कापडगाव, रत्नागिरी) हा तरुण २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ च्या सुमारास आपल्या युनिकॉर्न मोटार सायकलने (एमएच ०८ एवाय २००७) रत्नागिरीकडून हातखंबाच्या दिशेने जात होता. पानवल येथील मलस्टे यांच्या बागेसमोर आला असता, रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता दुचाकी भरधाव वेगात चालवल्याने जयसूर्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट ब्लॉकवर जाऊन जोरात आदळली. या अपघातात जयसूर्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल स्पेश रघुनाथ भिसे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मृत जयसूर्या मांडवकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. स्वतःच्या मृत्यूस आणि दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा ४ मे रोजी रात्री नोंदवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3359688
Share This Article