जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे शिक्षक संघटनांना आश्वासन
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती यांची भेट घेऊन विविध शैक्षणिक समस्या मांडण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. संघटनांच्यावतीने नवोदित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
महसूल विभागाने सोपवलेल्या बीएलओ कामकाजाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे हे कामकाज शिक्षकांकडून काढून घ्यावे, अशी विनंती यावेळी शिक्षकांनी केली. शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांनी यात लक्ष घालण्याची ग्वाही दिली.
समाजशास्त्र, भाषा विषय पदवीधर शिक्षक यांचे तात्पुरते समायोजन झाले. यामुळे कमी पटसंख्येच्या लहान शाळांना दोन शिक्षक मिळाले. मात्र 6 वी, 7 वीच्या 19 पटसंख्येच्या वर्गाला फक्त 1 शिक्षक मिळाला. यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या पटावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. याचा विचार करता भविष्यात 1 जून 2026 पर्यंत रिक्त होणाऱ्या जागांवर अतिरिक्त शिक्षकांना संधी मिळावी, अशी मागणी संघटना पदाधिकारी यांनी केली. त्यासाठी शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांनी हिरवा कंदील दर्शवला आहे.
विज्ञान पदवीधर शिक्षक संच मान्यता आणि विज्ञान पदवीधर नियुक्ती यामुळे जादा होणाऱ्या शिक्षक पदांचा विचार करता आपल्या 12 वी विज्ञान पात्र शिक्षकांना विज्ञान पदवीधर म्हणून नियुक्ती देण्याबाबत जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके यांनी सकारात्मकता दर्शविली.
सध्या जिल्हाभरात ज्या शाळांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक मंजूर आहेत, तेथे निकषाप्रमाणे मुख्याध्यापक मंजूर करून सेवाज्येष्ठ शिक्षकांना प्राधान्य द्यावे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळा बांधकाम, दुरुस्ती, निर्लेखन अशा विविध शैक्षणिक गरजांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी दीपक माळी, संजय डांगे, नरेश सावंत, प्रवीण त्रिभुवने, रघुनाथ गोरे, विश्वनाथ सुर्वे, विश्वनाथ जौरत, सुनील करंबेळे, राजेशकुमार गुरव, सुहास वाडेकर, भागवत कुंभार, अमित गराडे, मनोज चिमाणे, प्रकाश जाधव, अनंत सावंत आदी उपस्थित होते.






