GRAMIN SEARCH BANNER

तळेघर तलावाच्या निकृष्ट कामाविरोधात मंडणगड तहसीलसमोर ग्रामस्थांचे साखळी उपोषण!

Gramin Varta
44 Views

मंडणगड : मंडणगड तालुक्यात मौजे तळेघर येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या तलावाच्या कामात निकृष्ट दर्जाचे सिमेंट व लोखंडी सळया  वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या कमी करण्यासाठी हा तलाव दुरुस्तीचा प्रकल्प हाती घेण्यात आला असला तरी, कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग उपअभियंता आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती. मात्र, स्थानिक प्रशासनाने या तक्रारीकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर बुधवारी मंडणगड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण छेडले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रशासकीय अधिकारी त्यांची बाजू ऐकून घेत नाहीत आणि कामाबाबतच्या ग्रामस्थांच्या सूचनांचे पालनही होत नाही. या दुर्लक्षामुळेच उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. गणेश सार्वेकर, चंद्रकांत जोंधळे, संजय करावडे, अनंत जाधव, शिवाजी घाटविलकर, गणेश निकम, बळीराम गोठल, गणेश साळवी, नामदेव साळुंखे, सुरेश पेडणेकर, नथूराम जाबरे, विनोद करावडे, काशीनाथ वास्कर, बबन गोठल, जयश्री पेडणेकर, सुप्रिया जोंधळे, सायली करावडे आणि अरुण रांगडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. दरम्यान, पोलीस निरीक्षक नितीन गवारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश शिगवण यांनी उपोषण स्थळास भेट देऊन ग्रामस्थांची अडचण समजून घेतली. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन तलावाच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

Total Visitor Counter

3368085
Share This Article