चिपळुणात सेतूसह महा ई सेवा केंद्रांमध्ये नागरिकांची गर्दी
चिपळूण: दहावी, बारावीनंतरच्या पुढील प्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून सेतूसह महाईसेवा केंद्रामध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे. दिवसाला २०० अर्ज येत आहेत. अधिकारी, कर्मचारी वेळेत दाखले तयार करण्यावर भर देत आहेत. यातूनच तीन महिन्यात येथे १५ हजार ९६७ दाखल्यांचे वितरण झाले आहे.
दरवर्षी दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील प्रवेशासाठी लागणारे उत्पन्न, रहिवास, वय राष्ट्रीयत्व अधिवास, ज्येष्ठ नागरिक, जात, उत्पन्न गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, ३३ टक्के महिला आरक्षण, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक केंद्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक राज्य आदी १२ प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी सेतू महाईसेवा केंद्रात विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होताना दिसते. यातील तात्पुरता रहिवास दाखला ७ दिवसात वगळता अन्य दाखले अर्ज केल्यापासून १५, २१, ४५ दिवसात मिळण्याची मुदत आहे.
मात्र दाखले उशिरा मिळून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना तातडीने दाखले तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सेतू कार्यालयाची जबाबदारी असलेले प्रसन्न पेठे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वाच्या प्रयत्नांमुळे १ एप्रिल ते ३ जुलैपर्यंत १५ हजार ९६७ दाखल्यांचे वितरण झाले आहे. त्यात उत्पन्नाच्या ११ हजार ४१५, रहिवास ५०, अधिवास १ हजार ३३४, ज्येष्ठ नागरिक ९, जात १ हजार ३९१, उत्पन्न गटात मोडत नसल्याच्या १ हजार ६१०, ३३ टक्के महिला आरक्षण ५, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक केंद्र ४८, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक राज्य १०२ आदी दाखल्यांचा समावेश आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी नसलेले दाखले वेळेत मिळत असल्याने विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.