सावर्डे : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार “हर घर तिरंगा” उपक्रमाचा शुभारंभ गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज मोठ्या उत्साहात करण्यात आला. २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत तीन टप्प्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाची आज प्रथम टप्प्यातील सुरुवात करण्यात आली.
या निमित्ताने विद्यालयाच्या मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे व उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भिंतींना तिरंगा ध्वजाने आकर्षक सजावट करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व राष्ट्रप्रेमाचे संवर्धन व्हावे यासाठी तिरंगा ध्वजाचे महत्त्व विशद करणारे संवाद, माहिती व प्रेरणादायी संदेश देण्यात आले.
या उपक्रमात विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृतकुमार कडगावे, प्रशांत सकपाळ यांनी विशेष मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागी करून घेतले. तिरंगा सजावट, माहिती सत्र व देशभक्तिपर वातावरणातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची जाणीव अधिक सशक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
“हर घर तिरंगा” उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये देशप्रेमाची नवी ऊर्जा निर्माण झाली असून, पुढील टप्प्यांमध्ये देखील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सावर्डे विद्यालयात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ
