मुंबई:मेफेड्रोन (एमडी) या घातक अमली पदार्थांचा मुंबईतील प्रमुख विक्रेता असलेला फैजल शेख आणि त्याची पत्नी अलफिया शेख यांच्याशी संबंधित मुंबईतील आठ ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभाग कार्यालयाने बुधवारी सकाळी छापे टाकले.
दाऊद टोळीशी संबंधित असलेला सलीम डोळा याच्याकडून तो थेट एमडी या अमलीपदार्थांची खरेदी करीत होता. फैजल शेख याला 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याला चेन्नई येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
सलीम डोळा हा केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर असून इंटरपोलनेही नोटीस जारी केली आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागानेही त्याच्याबद्दल माहिती देणार्याला बक्षीस जाहीर केले आहे. मूळचा अंकलेश्वर येथील डोळा हा दाऊद टोळीशी संबंधित असून तो रासायनिक पदार्थांची विक्री करतानाच अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतला गेला. इक्बाल मिरचीनंतर अमली पदार्थाची तस्करी तो सांभाळत असल्याचा संशय आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुणे, नागपूर या शहरांत एमडी या अमली पदार्थांची विक्री सुरू होती. संपूर्ण साठा मुंबई तसेच आसपासच्या परिसरातून पुरवला जात होता. याची मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला माहिती मिळाली होती. त्यानंतर छापेमारी करण्यात आली.
अमली पदार्थ बनवणार्या कारखान्यांना कच्चा माल पुरविणारा ब्रिजेश मोराबिया याला अटक केल्यानंतर सलीम डोळाचा मुलगा ताहिर तसेच भाचा मुस्तफा कुब्बावाला यांची नावे पुढे आली. गेली पाच वर्षे हा प्रकार सुरू होता, असेही चौकशीत स्पष्ट झाले.