रत्नागिरी: महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. उदयजी स्वरूपा रवींद्र सामंत यांच्या विशेष पुढाकाराने जिल्हा परिषद वाटद विभागातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना सुरक्षितता आणि सुविधा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असून, याचा लाभ शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
हा छत्री वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी वाटद विभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विभाग प्रमुख योगेंद्र कल्याणकर, उपविभाग प्रमुख आजीम चिकटे, विभाग संघटक अनिकेत सुर्वे, सोशल मीडिया समन्वयक तोसिफ अब्दुल रहीम पांजरी आणि युवासेना विभाग अधिकारी प्रशांत ऊर्फ बापू गोसाले यांची विशेष उपस्थिती होती.
याशिवाय, शिवसेना आणि युवासेनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच शिक्षक, पालक आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.