GRAMIN SEARCH BANNER

गुन्हे उघडकीस आणण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची जबरदस्त कामगिरी; राज्यात तिसरा क्रमांक

Gramin Varta
294 Views

रत्नागिरी : क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम्स (CCTNS) अंतर्गत सन 2025 मध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये जिल्ह्यात एकूण गुन्ह्यांचे प्रमाण घटले असून गुन्हे उघडकीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.

दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरीसारख्या गुन्ह्यांतून 21 कोटी 38 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. खून, खूनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत या गुन्ह्यांमध्ये 2025 साली 100 टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात आले. तसेच दरोडा, चोरी, वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे उघडकीचे प्रमाण 2024 मधील 45 टक्क्यांवरून 2025 मध्ये 66 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
जिल्ह्यात वाहन चोरीच्या 39 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 20 गुन्हे उघड करण्यात आले आहेत. महिलांविरोधातील गुन्हे व फसवणूक प्रकरणांमध्ये 2024 च्या तुलनेत घट झाली असून फसवणूक गुन्ह्यांमध्ये सुमारे 33 टक्क्यांची कमी नोंदवली आहे.

अवैध दारू, जुगार व अमली पदार्थविरोधी कारवाईतही पोलीस दलाने प्रभावी कामगिरी केली आहे. एनडीपीएस कायद्यान्वये 2025 मध्ये 75 कारवाया करण्यात आल्या. सायबर गुन्ह्यांतून 25 लाख रुपयांहून अधिक रक्कम पीडितांना परत मिळवून देण्यात आली आहे.

बेपत्ता व अपहरण प्रकरणांमध्येही समाधानकारक यश मिळाले असून बहुसंख्य व्यक्ती व सर्व मुला-मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तडीपारीची कारवाई, शस्त्र परवाने, पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी प्रकरणांची निर्गती वेळेत करण्यात आली असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

Total Visitor Counter

3136813
Share This Article