सिंधुदुर्ग : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आंतरराज्य घरफोडी आणि चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना बेंगळुरू, कर्नाटक येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. शंकर मधुकर पवार ऊर्फ हाड्या (वय अंदाजे २५) आणि राजू मधुकर पवार ऊर्फ गुड्या (वय अंदाजे २४), दोन्ही रा.
मोहोळ, जि. सोलापूर, अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने २१ जुलैपर्यंत आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी
९ जुलै रोजी रात्री १० ते १० जुलै रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी येथील न्यू खासकीलवाडा, श्रमविहार कॉलनी येथे अज्ञात आरोपींनी एका घरात अनधिकृत प्रवेश करून घरफोडीचा प्रयत्न केला. त्याचबरोबर लक्ष्मीनगर येथील एका घरासमोरून एक मोटरसायकल आणि वेलनेस रिसॉर्टसमोरील एक मोटरसायकल व दोन मोबाईलची चोरी केली होती. घटनास्थळी दोन पाळ कोयतेही मिळून आले होते. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२), ३०५(ब), ३३१(३), ३३१(४), ६२, ३२४(४), ३२४(५), १२६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास आणि अटक
या गुन्ह्याचा तपास सावंतवाडी पोलीस करत असताना, पोलीस अधीक्षक, डॉ मोहन दहीकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले. समांतर तपास करत असताना, संशयित आरोपी कोल्हापूरमार्गे कर्नाटकातून बेंगळूर येथे गेल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तात्काळ बेंगळूर, कर्नाटक येथे रवाना झाले.
१२ जुलै रोजी बेंगळूर येथील कामासंद्रा भागात लपून बसलेल्या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अधिक चौकशीत ते मोहोळ, जि. सोलापूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना या गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली.
आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ३० ते ३५ गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे. तसेच ते महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही आरोपी घरफोडी आणि चोरीचे सराईत गुन्हेगार असून, त्यांनी संघटित टोळीच्या माध्यमातून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांत गुन्हे केल्याचे दिसून येते. त्यामुळे या दोन्ही आरोपींबाबत महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांकरिता त्यांच्याकडील दाखल गुन्ह्यांत आवश्यकता असल्यास सिंधुदुर्ग पोलीस विभागाशी संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे. या गुन्ह्यांचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.
गोवा कळंगुट टॅक्सी चालकावरील हल्ल्याचे प्रकरण
या घटनेच्या अनुषंगाने, कळंगुट येथील ६५ वर्षीय टॅक्सी चालक संजीवन वेंगुर्लेकर यांच्यावर बुधवारी रात्री मालपे येथे पाच-सहा जणांच्या टोळीने हल्ला केल्याची घटनाही उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी चालकाला कळंगुट ते बांदा-सावंतवाडीपर्यंत भाडे असल्याचे सांगून टॅक्सी बुक केली होती. यानंतर पाच जण भाडेकरू म्हणून आणि टॅक्सीचालक सावंतवाडीच्या दिशेने निघाले. दरम्यान, मालपे-पेडणे येथे पोहोचताच या पाच हल्लेखोरांनी चालकावर प्राणघातक हल्ला करून त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वेंगुर्लेकर यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरटे सापडले नसून ते दुचाकीने पसार झाले आहेत. त्यातील एक दुचाकी कणकवली येथे रस्त्याच्या बाजूला सापडली. पेडणे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली असून टॅक्सी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारवाई करणारे पथक
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्री. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक कुमारी नयोना साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे, श्री. अमोल चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक श्री. जे.ए. खंदरकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
आंतरराज्य घरफोडी आणि चोरी करणारे दोन सराईत आरोपी बेंगळुरूतून जेरबंद, सिंधुदुर्ग पोलीसांची कारवाई
