GRAMIN SEARCH BANNER

खेड: ऐनवली येथे विट भट्टीवर आढळली अल्पवयीन विवाहित जोडपी

Gramin Varta
465 Views

खेड: तालुक्यातील ऐनवली गावातील एका वीटभट्टीवर दोन अल्पवयीन विवाहित जोडपी बालकामगार म्हणून काम करत असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. संबंधित दोन्ही मुली अल्पवयीन असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने तत्काळ खेड पोलिसांना पाचारण केले.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन पीडित मुलींची प्राथमिक चौकशी केली. या दोन्ही मुली विवाहित असून त्या पतीसोबत वीटभट्टीवर मजुरीचे काम करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या मुलींना खेड पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ही दोन्ही जोडपी ऐनवली येथील एका खासगी वीटभट्टीवर काम करत होती. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने सदर वीटभट्टीवर इतरही अल्पवयीन मुले किंवा मुली काम करत आहेत का, या दृष्टीने तपासचक्र फिरवली आहेत.

या प्रकरणात केवळ बालकामगार कायद्याचेच नव्हे, तर बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या तरतुदींनुसारही कठोर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका बाजूला बालकामगार म्हणून राबवून घेणे आणि दुसऱ्या बाजूला कायद्याने गुन्हा असलेला बालविवाह करणे, अशा दोन्ही गंभीर बाबी या प्रकरणात समोर आल्या आहेत. खेड पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून यामागे मोठे रॅकेट आहे का किंवा वीटभट्टी मालकाचा यात काय सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन लवकरच दोषींवर कायदेशीर बडगा उगारणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3072146
Share This Article