मुंबई: शेतकरी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य ह्या संघटनेने मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृतपणे विलीनीकरण केले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बिलेवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य आणि जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज पक्षप्रवेश केला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अनेकजण मला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्यासमोर प्रश्न उभा ठाकलाय की मी संपतो का? काही लोक गद्दार होतात, विकले जातात. पण माझे निष्ठावंत कार्यकर्ते विकले जात नाहीत. म्हणूनच माझे जुने सहकारी आजही माझ्यासोबत आहेत. जे गेले ते गेले, पण आज त्यांच्या खालील माणसं माझ्यासोबत आहेत.”या प्रवेश सोहळ्याच्या वेळी खासदार अरविंद सावंत, प्रवक्त्या जयश्री शेळके, आमदार संजय देरकर, बुलडाण्याचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी मातोश्रीवर दाखल झाले होते, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या प्रवेश सोहळ्यात वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात ३ जिल्हा परिषद सदस्य आणि ४५ सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा बळ पुरवणारा ठरणार आहे.पश्चिम विदर्भात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सेनेचा पायपोस अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी या भागातील काही मोठी फळी शिंदे गटात गेल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी ही नवीन फळी महत्त्वाची ठरणार आहे. बुलडाण्याचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी या भागात सेनेचे बळ वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.शेतकरी क्रांती संघटनेचे कार्य घाटमाथा व घाटाखालच्या भागात असून, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बिलेवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी आज पक्षप्रवेश केला. त्यामुळे पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक बळात लक्षणीय वाढ होणार असल्याचे दिसते.गेल्या काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने नवीन नेतृत्वाची मांडणी केली असून भाजपनेही जम्बो कार्यकारणीची घोषणा केली आहे. अशा पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या सेनेने केलेली ही भरती विशेष लक्षवेधी ठरली आहे.
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलीन
