GRAMIN SEARCH BANNER

कोकणात उष्ण व दमट हवामानासह पावसाची शक्यता, विद्यापीठाकडून विशेष कृषी सल्ला जारी

Gramin Varta
80 Views

रत्नागिरी :  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी विशेष हवामान अंदाज आणि कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या पूर्वानुमानानुसार, आगामी पाच दिवसांत कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानासह विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या हवामानाचा फटका शेती आणि पशुधनाला बसू नये म्हणून शेतकऱ्यांनी तातडीने खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात २६ आणि २७ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची अत्यंत शक्यता आहे, तर २८ ते ३० मे दरम्यान येथे हलका पाऊस पडू शकतो. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही २६ व २७ मे रोजी दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून पुढील दोन दिवस वातावरण असेच राहील. या पार्श्वभूमीवर आंबा बागायतदारांना मोठा सल्ला देण्यात आला असून, पक्व झालेली आंबा फळे झाडावरून गळून पडण्यापूर्वी किंवा पावसाने खराब होण्यापूर्वी तातडीने नूतन झेल्याच्या साहाय्याने देठासह काढून सुरक्षित व झाकलेल्या ठिकाणी हलवण्यास सांगितले आहे. काढणीचे काम सकाळी १० च्या पूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर करावे. तसेच, नवीन आंबा कलमांच्या खोडाला तीव्र उन्हापासून वाचवण्यासाठी बोर्डो पेस्ट लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


फळबागांमधील चिकू, नारळ आणि सुपारीच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी बागेला ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी बुंध्याभोवती पेंढा किंवा गवताचे आच्छादन करावे. नव्याने लागवड केलेल्या लहान रोपांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी शेडनेट किंवा झावळ्यांची सावली करावी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रोपे कोलमडू नयेत म्हणून त्यांना मजबूत काठ्यांचा आधार द्यावा. लहान कलमांना वयानुसार आवश्यकतेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी.


वाढत्या तापमानाचा आणि संभाव्य वादळाचा फटका पशुधनाला बसू नये म्हणून पशुपालकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांना शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसे स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी १ टक्के गूळ आणि ०.५ टक्के मीठ यांचे द्रावण चाऱ्यावर शिंपडावे तसेच दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. संभाव्य विजांचा कडकडाट पाहता जनावरांना कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली बांधू नये, त्यांना सुरक्षित गोठ्यात किंवा शेडमध्ये ठेवावे. कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेडच्या छतावर गवत किंवा पेंढा टाकून त्यावर पाणी शिंपडावे आणि वाऱ्या-पावसापासून संरक्षणासाठी शेडच्या खिडक्या व्यवस्थित बंद ठेवाव्यात.


या उष्ण व दमट हवामानाचा परिणाम शेतमजुरांवरही होऊ शकतो, त्यामुळे दुपारच्या तीव्र उन्हात शेतात काम करणे टाळावे. कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय असावी. जर एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास झाल्यास त्याला तातडीने ओल्या कापडाने पुसून घ्यावे आणि लिंबू पाणी किंवा ओआरएसचे द्रावण द्यावे. चक्कर येणे, मळमळ किंवा अशक्तपणा जाणवल्यास रुग्णाला त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे, असे आवाहनही या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3420611
Share This Article