हातखंबा तिठा येथे चारी बाजूंनी वाढतोय अपघातांचा धोका; वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी

Gramin Varta
151 Views

रत्नागिरी : शहराच्या प्रवेशद्वारावरील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा तिठा दिवसेंदिवस अपघातप्रवण ठरत असून, वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे या ठिकाणी वाहनचालक आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शहराकडे जाणाऱ्या तसेच मुंबई, गोवा आणि कोल्हापूरच्या दिशेने धावणाऱ्या अवजड व हलक्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने हा चौक कायम गजबजलेला असतो. मात्र वाहतुकीचे प्रभावी नियोजन नसल्याने येथे वारंवार अपघात घडत असून स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.हातखंबा तिठा हा रत्नागिरी शहराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा चौक आहे.

महामार्गावरील भरधाव वाहने आणि शहराकडे वळणारी वाहने एकाच ठिकाणी येत असल्याने वाहनचालकांना अनेकदा धोका पत्करून मार्ग काढावा लागतो. चौकात वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती नसणे, स्पष्ट दिशादर्शक फलकांची कमतरता, रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश आणि योग्य सिग्नल यंत्रणेचा अभाव यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून केली जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या चौकात लहान-मोठे अपघात सातत्याने घडत असून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. काही वेळा जीवघेण्या दुर्घटनाही घडल्या असून, त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाहतुकीची वाढती गर्दी लक्षात घेता या चौकाचे तातडीने पुनर्नियोजन करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चौकात वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, स्पष्ट दिशादर्शक फलक, रात्रीच्या वेळी उच्च क्षमतेची प्रकाशयोजना, वेग नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक किंवा वाहतूक नियंत्रित करणारी संरचना उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, हातखंबा तिठ्यावरील अपघातांची वाढती मालिका लक्षात घेऊन संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Total Visitors :
4618078
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *