भरती होतात रत्नागिरीत, बदली मागतात गावी, रत्नागिरीत एकाचवेळी ८५० पोलिस कर्मचाऱ्यांची बदलीची मागणी

Gramin Varta
609 Views

पोलिस प्रशासनासमोर मनुष्यबळ व्यवस्थापनाचे मोठे आव्हान

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांकडून मूळ जिल्ह्यात बदली मिळावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्यात आले आहेत. एकाचवेळी तब्बल ८५० पोलिस कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केल्याने जिल्हा पोलिस प्रशासनासमोर मनुष्यबळ व्यवस्थापनाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

रत्नागिरी हे राज्यातील महत्त्वाचे पोलिस भरती केंद्र मानले जाते. जिल्हा पोलिस दलात सुमारे १,७५० पदे मंजूर असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. मात्र, काही वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर अनेक कर्मचारी आपल्या मूळ जिल्ह्यात बदली मिळविण्यासाठी अर्ज करतात.

नियमांनुसार ठरावीक सेवा पूर्ण केल्यानंतरच बदलीची प्रक्रिया राबविली जाते. वैद्यकीय कारणे, पती-पत्नी एकत्रीकरण, कुटुंबातील अडचणी किंवा अन्य वैध कारणांवर अर्ज स्वीकारले जातात. मात्र, यावेळी एकाचवेळी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

मोठ्या प्रमाणावर कर्मचारी जिल्ह्याबाहेर गेल्यास स्थानिक पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रिक्त होणारी पदे तातडीने भरली जाणे आणि बदली प्रक्रियेत योग्य समतोल राखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, या अर्जांबाबत जिल्हा पोलिस प्रशासनाकडून नियमांनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात असून, बदली प्रक्रियेबाबत अंतिम निर्णयाकडे संबंधित कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4609995
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *