अब तेरा क्या होगा राजू?
रत्नागिरी : तालुक्यातील विल्ये गावात सुरू असलेल्या बेकायदा बॉक्साइड उत्खननाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत ग्रामीण वार्ता ने वारंवार आवाज उठवला होता. परदेशात बॉक्साइड निर्यात होत असताना महसूल पोलीस यंत्रणा झोपली होती का? अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताने ग्रामस्थांत खळबळ उडाली. ग्रामस्थानी एकजूट करत प्रशासनात जाब विचारण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे.
विल्ये गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर बॉक्साइट उत्खननामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मास्टर राजू व संदखोलकर राणादा यांनी गावात धुडगूस घालून सुमारे 20 हजार ब्रास बॉक्साइट जयगडच्या जेएसडब्ल्यू बंदरावरून परस्पर परदेशात पाठवून दिले आहे. या मुजोर उत्खननामुळे गावाची शांतता भंग झाली असून स्थानिक प्रशासनाचे वर्तन संशयास्पद ठरत आहे.
या अनधिकृत उत्खननामुळे विल्ये गावातील जमिनीत पोकलेनद्वारे उत्खनन सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या उत्खननाने गावातील जलस्त्रोत पूर्णपणे लाल झाले असून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विल्ये-जयगड मार्गावरून दिवसाला असंख्य हायवा गाड्या ओव्हरलोड बॉक्साइट घेऊन भरधाव धावत आहेत. एरवी फटाका फुटला तरी तत्परतेने धावून जाणारी यंत्रणा एवढी मोठी वाहतूक सुरू असतानाही पूर्णपणे शांत कशी राहिली? महसूल विभाग, खनिकर्म विभाग, पोलीस आणि आरटीओ या सर्वांनाच या बेकायदेशीर प्रकाराबाबत कशी माहिती मिळाली नाही? प्रशासनाने कोणते अर्थपूर्ण चष्मे घातल्यामुळे या हायवा गाड्या दिसत नाहीत, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
सुरुवातीला ग्रामस्थांना कोणीतरी शेतीसाठी, बागकामासाठी किंवा विहीर खोदण्यासाठी पोकलेनद्वारे काम सुरू ल असेल असा ग्रामस्थांचा समज झाला होता. मात्र, ग्रामीण वार्ता’ ने या गंभीर प्रकाराविरुद्ध आवाज उठवून वास्तव चव्हाट्यावर आणल्यानंतर विल्ये गावातील ग्रामस्थ जागरूक झाले आहेत. आता ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.
या सर्व बेकायदेशीर कृत्यामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांनी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी आणि गावाला या त्रासातून पूर्णपणे मुक्त करावे, अशी ठाम मागणी केली आहे. प्रशासनाच्या या डोळेझाक भूमिकेविरोधात आणि दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी आगामी १५ ऑगस्ट रोजी विल्ये ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामीण वार्ताच्या वृत्ताची दखल : विल्येतील बेकायदा बॉक्साइड उत्खननाविरोधात ग्रामस्थांचा संताप, 15 ऑगस्टला उपोषण
Leave a Comment





