चिपळूण: आईला वाचवण्याच्या प्रयत्नात ३१ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
452 Views
One pair of Feet alone in Bed on White Sheets sleeping under a blanket, relaxion cute

चिपळूण : आईला विजेचा धक्का लागल्याचे पाहताच तिच्या मदतीसाठी धाव घेतलेल्या एका ३१ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली येथील भुवडवाडीत घडली. अक्षय चंद्रकांत मेगे (वय ३१, रा. खांदाटपाली, भुवडवाडी, ता. चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी सकाळच्या सुमारास अक्षयची आई घराच्या पडवीत वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या लोखंडी तारेत अचानक वीजप्रवाह उतरल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर घरात असलेला अक्षय तात्काळ बाहेर धावला.

आई जमिनीवर पडलेली पाहताच तिला वाचवण्याच्या प्रयत्नात अक्षयने तिला स्पर्श केला. मात्र, त्यालाही विजेचा तीव्र धक्का बसला आणि तोही जागीच कोसळला. हा प्रकार पाहून शेजारी राहणारे संजय बाबू भुवड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अक्षयचा श्वास सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला तातडीने चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र, सकाळी सुमारे ९.०५ वाजता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आईला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता धावलेल्या अक्षयच्या दुर्दैवी मृत्यूमुळे खांदाटपाली परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4598441
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *