चिपळूणमध्ये काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ काढला मोर्चा आणि ठिय्या आंदोलन

Gramin Varta
282 Views

चिपळूण : दिल्लीतील जंतर-मंतर येथे खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेत मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला असून, यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह अन्य मागण्यांसाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात दिल्ली पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. याप्रकरणी मोदी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी आंदोलन केले असता, दिल्ली पोलिसांनी खा. राहुल गांधी यांना गाडीत बसवून पोलीस ठाण्यात तब्बल तीन तास बसवून ठेवले. या वागणुकीच्या निषेधार्थ चिपळूण काँग्रेसने हे जोरदार आंदोलन हाती घेतले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही काळ चिपळूण नगर परिषदेसमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनादरम्यान खा. राहुल गांधी यांच्याशी करण्यात आलेल्या गैरव्यवहाराचा निषेध व्यक्त करत लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी केंद्र सरकारवर टीका करत विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे काही काळ परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता. या निषेध आंदोलनात माजी नगरसेविका सौ. गौरी रेळेकर, कमलेश देसाई, रफिक मोडक, अशोक भुस्कुटे, नगरसेवक साजिद सरगुरोह, नगरसेविका सफा गोठे, संजय जाधव आदींसह अनेकजण उपस्थित होते.

Total Visitors :
4576143
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *