चिपळूण रेल्वे स्थानकावरील बंद तिकीट खिडकी अखेर सुरू; शौकत मुकादम यांच्या पाठपुराव्याला यश, प्रवाशांना मोठा दिलासा

Gramin Varta
12 Views

चिपळूण (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या तोंडावर चिपळूण रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस असलेली आणि गेल्या अनेक महिन्यांपासून कुलूपबंद अवस्थेत पडलेली शहरानजीकची तिकीट खिडकी अखेर पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी पंधरा दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष वेधत गणेशोत्सवापूर्वी ही खिडकी तातडीने सुरू करण्याची आग्रही मागणी लावून धरली होती. रेल्वे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेत २ सप्टेंबरपासून ही तिकीट खिडकी प्रवाशांच्या सेवेत पुन्हा दाखल केली आहे. या निर्णयामुळे चिपळूण शहर परिसरासह गुहागर तालुका आणि लगतच्या ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय टळली असून ऐन सणासुदीत नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

तिकीट खिडकी कार्यान्वित झाल्यानंतर कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी ३ सप्टेंबर रोजी पुन्हा रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. प्रवाशांची अडचण दूर केल्याबद्दल त्यांनी रेल्वे प्रशासनासह कमर्शियल सुपरवायझर खांबे यांचे आभार मानले. त्याचवेळी स्थानकाच्या मागील परिसराच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत, समोरील दर्शनी भागाप्रमाणेच या मागील भागाचेही तातडीने सुशोभीकरण करण्यात यावे आणि परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करून प्रवाशांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणीही त्यांनी या वेळी केली.

Total Visitors :
4802993
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *