खेड (प्रतिनिधी) : खेड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभागांतील महिलांसाठी प्रीमिक्स पदार्थ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या प्रशिक्षण शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महिलांना घरगुती पातळीवर विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचे कौशल्य मिळावे तसेच या कौशल्याचा उपयोग करून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रीमिक्स पदार्थ तयार करण्याची पद्धत, त्यासाठी आवश्यक साहित्य, पदार्थांची गुणवत्ता आणि त्याचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन व विक्री करण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिरास खेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती भूषण चिखले, नगरसेवक प्रेमल चिखले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका खेडेकर तसेच उपसभापती वर्षा सापटे यांची उपस्थिती होती.
महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, त्यातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. प्रीमिक्स पदार्थ प्रशिक्षण शिबिरामुळे महिलांना नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली. प्रशिक्षणासाठी शहरातील विविध प्रभागांमधून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रशिक्षण शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.






