खेड : मुंबई-गोवा महामार्गावर लोटे एमआयडीसी परिसरातील कॉर्टेवा कंपनीसमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्रा थार रॉक्स वाहनाने एका अनोळखी महिलेला धडक दिल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या अपघातात अंदाजे ४५ वर्षीय महिला जखमी झाली असून, याप्रकरणी खेड पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरीफ इसाक साठविलकर (वय ३७, रा. परळेमाण, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) हा महिंद्रा थार रॉक्स (क्र. एमएच ०९ जीयू ७२७५) घेऊन ६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.१० वाजता खेडकडून चिपळूणच्या दिशेने जात होता. लोटे एमआयडीसीतील कॉर्टेवा कंपनीसमोर महामार्गावर आल्यानंतर त्याने वाहन भरधाव व हयगयीने चालविल्याचा आरोप आहे.
यावेळी महामार्गावरील मध्यभागातील डिव्हायडरजवळून खेडच्या दिशेने जात असलेल्या अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी महिलेला थार वाहनाने समोरून धडक दिली. या धडकेत महिलेला किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अपघातात थार वाहनाचेही किरकोळ नुकसान झाले.
या घटनेची नोंद २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३४ वाजता खेड पोलिस ठाण्यात करण्यात आली. पोलिस हवालदार अजित संतोष कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आरीफ साठविलकर याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २३२/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.
लोटे एमआयडीसीजवळ भरधाव थारची अनोळखी महिलेला धडक; चालकावर गुन्हा
Leave a Comment






