रत्नागिरी : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नाट्य चळवळीतील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याच्या समन्वयकपदी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागाचे प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे यांच्या वतीने पुणे विद्यापीठ स्तरावर १९६३ पासून पुरुषोत्तम करंडक स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली जात आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता सन २०१० पासून ही स्पर्धा पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या केंद्रांवर घेतली जात आहे. या केंद्रांवरील पारितोषिक विजेत्या एकूण २० संघांची डिसेंबर महिन्यात पुण्यात राज्यस्तरीय महाअंतिम फेरी होते. महाअंतिम स्पर्धेचा संपूर्ण खर्च महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे या संस्थेतर्फे केला जातो. यंदाच्या २०२६ च्या स्पर्धेसाठी रत्नागिरी केंद्राचे समन्वयक म्हणून डॉ. आनंद आंबेकर पाहणी करणार आहेत. ते गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) मागील २७ वर्षांपासून विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
ही नियुक्ती महाराष्ट्रीय कलोपासक पुणेचे चिटणीस राजन ठाकूरदेसाई आणि खजिनदार सुहास नांगरे यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. या निवडीबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, कार्यकारी सदस्य डॉ. संजय केतकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, उपप्राचार्य डॉ. सीमा कदम तसेच कलोपासक पुणेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. आनंद आंबेकर यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सांस्कृतिक चळवळ अधिक यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






