रत्नागिरी : तालुक्यातील निवेंडी येथे प्रस्तावित एमआयडीसीच्या भूसंपादनाचा रखडलेला प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने आहे. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याने ९५ हेक्टर जागेच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या १२० कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात ६० कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे निवेंडी एमआयडीसीच्या कामाला आता प्रशासकीय पातळीवर वेग येण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी निवेंडी येथे एमआयडीसी उभारण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती. त्यानंतर निवेंडी पंचक्रोशीतील जागांची मोजणी करून भूसंपादनाची प्रक्रियाही राबवण्यात आली. सुरुवातीला १०५ हेक्टर जागेचे भूसंपादन करण्याचे नियोजन होते. मात्र आता ९५ हेक्टर जागेवर निवेंडी एमआयडीसी उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्याचे उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार उदय सामंत हे निवेंडी एमआयडीसीसाठी विशेष प्रयत्नशील होते. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूचे उत्पादन होते. या उत्पादनावर प्रक्रिया करणारे मोठे प्रकल्प निवेंडी एमआयडीसीमध्ये यावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते. फळप्रक्रिया प्रकल्प उभारल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच आंबा, काजू आणि कोकणी मेव्याला चांगला भाव मिळण्यास मदत होईल, असा यामागील उद्देश आहे.
मात्र निधीअभावी निवेंडी एमआयडीसीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. आता शासनाने त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. ९५ हेक्टर जागेच्या भूसंपादनासाठी १२० कोटी रुपयांची आवश्यकता असून, त्यापैकी ६० कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे निवेंडी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने आता प्रत्यक्ष पावले पडण्यास सुरुवात झाली असून, या प्रकल्पामुळे रत्नागिरीतील औद्योगिक विकासासह स्थानिक रोजगाराला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
निवेंडी एमआयडीसीचा मार्ग मोकळा; १२० कोटींच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात ६० कोटींचा निधी प्राप्त
Leave a Comment






