मुंबई: महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हवामानाचा लहरीपणा वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, पुढील पाच दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर वेधशाळेने राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देत अधिकृतपणे ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत वातावरणात वेगाने बदल होऊन जोरदार सरी कोसळण्याची चिन्हे आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ११ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड यासह यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर १२ सप्टेंबरला पावसाचा जोर अधिक व्यापक होणार असून, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या किनारपट्टीच्या भागांसह धुळे, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या विस्तीर्ण पट्ट्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
१३ सप्टेंबर रोजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, पुणे घाट, सातारा, सातारा घाट, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर १४ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, पुणे, पुणे घाट, अहिल्यानगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. अचानक उद्भवणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी, बाधित भागातील नागरिकांनी अत्यंत आवश्यक ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




