सीएमए डॉ. शमीम मेमन यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी.

Gramin Varta
323 Views

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय शैक्षणिक यश

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आर. पी. गोगटे कला व विज्ञान महाविद्यालय आणि आर. व्ही. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण करणाऱ्या सीएमए शमीम मेमन यांना मुंबई विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.

सीएमए शमीम मेमन यांनी “A Study of Financial Literacy of College Teachers in Goa” या विषयावर सखोल संशोधन केले. या संशोधनासाठी गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य सीएमए डॉ. मकरंद साखळकर यांनी त्यांना मार्गदर्शक म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले.

शमीम मेमन या सध्या गोव्यातील व्ही. एम. साळगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी एज्युकेशन, राया येथे वित्तीय लेखाशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनाच्या जबाबदारीसोबतच त्या संशोधन, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातही सक्रियपणे योगदान देत आहेत. आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिक्षण हे त्यांच्या अभ्यास व संशोधनाचे प्रमुख क्षेत्र आहे.

त्यांच्या पीएच.डी. संशोधनामध्ये गोव्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या आर्थिक साक्षरतेची पातळी, आर्थिक नियोजन आणि आर्थिक वर्तनाचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. त्याचबरोबर शिक्षकांच्या आर्थिक ज्ञानाचा निवृत्ती नियोजन, विमा नियोजन आणि कर नियोजनाशी असलेला संबंधही तपासण्यात आला आहे. आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिक्षणामुळे व्यक्तींना आपल्या आर्थिक बाबींविषयी अधिक योग्य, सक्षम आणि माहितीच्या आधारे निर्णय घेण्यास मदत होते, हा महत्त्वपूर्ण निष्कर्ष या संशोधनातून अधोरेखित करण्यात आला आहे.

पीएच.डी. पदवी प्राप्त करणे हे सीएमए डॉ. शमीम मेमन यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि व्यावसायिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Total Visitors :
4825609
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *