रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणच्या क्रीडा पर्यटनाचा संदेश थेट हिमालयाच्या कुशीत पोहोचवत कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची विशेष प्रोमो रन लेह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. देशभरातील सुमारे २०० धावपटूंनी या उपक्रमात सहभागी होत कोकणातील या वैशिष्ट्यपूर्ण मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील एखाद्या मॅरेथॉनचे थेट लडाखमध्ये येऊन अशा पद्धतीने प्रमोशन होण्याची ही आगळीवेगळी बाब ठरली.
लडाखमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी गेल्या तेरा वर्षांपासून लेह मॅरेथॉनचे आयोजन केले जात असून, यंदाच्या स्पर्धेसाठी देशभरातून सुमारे सहा हजार धावपटू लेहमध्ये दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरातील धावपटूंना कोकणात आकर्षित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे लेहमध्ये प्रभावी प्रमोशन करण्यात आले.
या प्रचार मोहिमेसाठी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची टीम २० ऑगस्ट रोजी रत्नागिरीहून रवाना झाली. सुरत, वडोदरा, गांधीनगर, इंदूर, जयपूर, आग्रा, गाझियाबाद आदी रत्नागिरीशी रेल्वेने जोडलेल्या शहरांमधील विविध रनिंग कम्युनिटींना भेटी देत ही टीम लेह येथे पोहोचली. गेल्या चार वर्षांपासून देशभरातील अधिकाधिक धावपटूंना कोकणाकडे आकर्षित करण्यासाठी आयोजकांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
लेह मार्केट–शांती स्तूप–लेह मार्केट या मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या प्रोमो रनमध्ये देशाच्या विविध भागांतील नामवंत धावपटूंनी सहभाग घेतला. १५ वेळा कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केलेले सतीश गुजराण, कॉम्रेड्स मॅरेथॉनमधील भारतातील वेगवान धावपटू व प्रशिक्षक योगेश सानप, एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉनच्या व्यवस्थापन समितीचे दिनेश हेडा, तेलंगणा पोलिसांच्या अँटी करप्शन विभागातील पिल्ली राजू, मंगळुरूचे महवीश हुसेन तसेच हिमाचल प्रदेशातील अल्ट्रा रनर तेनझिंग डोलमा यांच्यासह अरुणाचल प्रदेशापासून गुजरातपर्यंतच्या धावपटूंनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.
या उपक्रमाचे प्रमुख आणि सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी हे जगातील अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या ७२ किलोमीटरच्या खारदुंग-ला चॅलेंजमध्ये सहभागी झाले आहेत. सुमारे ३०० स्पर्धकांमध्ये त्यांचा समावेश आहे. तर अभिजीत पड्याळ यांनी ४२ किलोमीटरच्या फुल मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे.
लेहमध्ये झालेल्या प्रोमो रनला धावपटूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोकणातील मॅरेथॉनचे थेट लडाखमध्ये येऊन केलेले प्रमोशन हे वेगळे आणि प्रेरणादायी असल्याची भावना अनेक धावपटूंनी व्यक्त केली. कोकणवासीय ज्या उत्साहाने या स्पर्धेचा प्रचार करत आहेत, त्यामुळे आता कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी कोकणात यायलाच हवे, अशा प्रतिक्रिया धावपटूंनी दिल्या.
या प्रचार मोहिमेला रुचकर प्रॉडक्ट्सचे सुनील सहस्रबुद्धे यांचे विशेष सहकार्य लाभले. रत्नागिरीपासून लेहपर्यंत भेटलेल्या विविध रनिंग कम्युनिटी तसेच लेहमधील धावपटूंना रुचकरची हापूस आंब्याची आंबावडी भेट देण्यात आली. आंबावडीची चव घेतल्यानंतर अनेक धावपटूंनी तिचे कौतुक करताना ‘आंबावडी इतकी स्वादिष्ट असेल तर कोकण किती सुंदर असेल,’ अशा शब्दांत कोकणाबद्दल उत्सुकता व्यक्त केली.
कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचा एकदिशीय अर्थात पॉइंट-टू-पॉइंट मार्ग हे या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. बहुतांश हाफ मॅरेथॉनमध्ये धावपटूंना त्याच मार्गाने परतावे लागते; मात्र कोकण कोस्टलमध्ये संपूर्ण २१.१ किलोमीटरचा मार्ग प्रत्येक टप्प्यावर नवा अनुभव देणारा आहे. समुद्रकिनारा, निसर्ग आणि कोकणचे वैशिष्ट्यपूर्ण वातावरण अनुभवत धावण्याची संधी मिळत असल्याने देशभरातील धावपटूंमध्ये या स्पर्धेबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.
येत्या ३ जानेवारी २०२७ रोजी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे चौथे पर्व होणार असून, यंदा या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयोजक प्रसाद देवस्थळी यांनी व्यक्त केला. दरम्यान, लेहमध्ये प्रचार मोहीम सुरू असतानाच रत्नागिरीत टीम पंचकन्या मानसी मराठे, अंकिता पाटकर, स्नेहल कलाल, केतकी लेले आणि राधा बसणकर यांच्या माध्यमातून दर रविवारी मोफत प्रॅक्टिस रन सुरू आहे. बाहेरून येणाऱ्या धावपटूंसोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक धावपटूंचाही मोठ्या संख्येने सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
सलग ११० रविवार ही मोफत प्रॅक्टिस रन अखंडपणे सुरू असून, त्याचे सकारात्मक परिणाम ३ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनसह २८ मार्च २०२७ रोजी आयोजित गणपतीपुळे हाफ मॅरेथॉनमध्ये दिसून येतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.






