चिपळूण: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी चिपळूण नगरपरिषदेने बुधवारी धडक पाऊल उचलत रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर थेट कारवाईचा बडगा उगारला. नगरपालिका ते गांधी चौक आणि बाजारपूल या मुख्य मार्गावर गटारींवर तसेच थेट रस्त्याकडेला स्टॅण्ड, टेबल व हातगाड्या मांडून नियमबाह्य व्यापार करणाऱ्या सुमारे २० ते २५ दुकानदारांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने तीन ट्रॉली साहित्य आणि आठ हातगाड्या जप्त केल्याने बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे.
बाजारपेठेत गटारांच्या पुढे वाढलेल्या या अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद होऊन वाहनांच्या वर्दळीला मोठा अडथळा निर्माण होत होता, तसेच ग्राहकांसाठी वाहने उभी करायला जागाच शिल्लक राहत नव्हती. या वाहतूक कोंडीला कंटाळून खरेदीसाठी येणारे ग्राहक थेट काविळतळी आणि बहादूरशेख नाका परिसराकडे वळू लागल्याने, नियमांचे काटेकोर पालन करून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता. या गंभीर स्थितीबाबत नागरिक, स्थानिक व्यापारी तसेच लोकप्रतिनिधींकडून नगरपालिकेकडे सातत्याने तीव्र तक्रारी येत होत्या. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या बैठकीत या विषयावर जोरदार चर्चा झडल्यानंतर पाच कर्मचाऱ्यांचे विशेष अतिक्रमणविरोधी पथक स्थापन करून नियमित मोहीम राबवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.
प्रत्यक्ष कारवाईपूर्वी संबंधित दुकानदारांना स्वतःचे वाढीव साहित्य आत घेण्याबाबत पालिकेने तब्बल तीन वेळा स्पष्ट सूचना दिल्या होत्या; परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर पथकाने रस्त्यावर उतरून साहित्य जप्तीची मोहीम राबवली. मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यालय अधीक्षक तथा अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख रोहित खाडे यांच्या नेतृत्वाखाली संदेश टोपरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. पालिकेच्या या कठोर पावलामुळे प्रामाणिक व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत असून, सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठेतील गर्दी आणि कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी अशी कारवाई सातत्याने सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





