पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण; प्रत्येक कुटुंबासाठी २५ लाखांचे सुसज्ज घर
अलोरे: तिवरे धरण दुर्घटनेच्या काळजाला चटका लावणाऱ्या आठवणींना उजाळा देत दुर्घटनेतील बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा महत्त्वपूर्ण टप्पा गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पूर्ण झाला. अलोरे येथे उभारण्यात आलेल्या पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकल्पग्रस्त कुटुंबीयांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. प्रत्येक कुटुंबासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली ही सुसज्ज घरे देशातील वैशिष्ट्यपूर्ण पुनर्वसन प्रकल्पांपैकी एक असल्याचे डॉ. सामंत यांनी सांगितले.
तिवरे-भेंदवाडी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत अलोरे येथील घर क्रमांक २५ ते ४३ आणि तिवरे येथील घर क्रमांक ४४ ते ५७ अशा घरांच्या बांधकामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. दुर्घटनेत जीव गमावलेल्या तसेच बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी हा पुनर्वसन प्रकल्प उभारण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाधित कुटुंबांना नव्या घरांचा हक्क मिळाल्याने त्यांच्या आयुष्यात नव्या सुरुवातीची आशा निर्माण झाली आहे.
यावेळी बोलताना डॉ. उदय सामंत म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांना घरे देऊन शासनाने कोणतेही उपकार केलेले नाहीत, तर हे शासनाचे कर्तव्य आहे. दुर्घटनेच्या वेळी दिलेला शब्द आज प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात या नव्या घरांपैकी एका घरात जरी गणरायाची प्रतिष्ठापना झाली, तरी तो आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण असेल. तिवरे गावासारखी दुर्दैवी परिस्थिती पुन्हा कोणावरही येऊ नये, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या वस्तीत सर्वांनी एकोप्याने आणि जबाबदारीने राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तिवरे धरण दुर्घटनेतून बचावलेल्या चिमुकल्या रुद्रच्या घराचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. रुद्रच्या भवितव्याबाबत संवेदनशीलता व्यक्त करताना डॉ. सामंत यांनी त्याला देशाचा सुजाण आणि यशस्वी नागरिक घडविण्याची जबाबदारी समाजाची असल्याचे सांगितले. त्याचे पालनपोषण योग्य पद्धतीने व्हावे तसेच तो सज्ञान झाल्यानंतर त्याची मालमत्ता आणि सर्व हक्क सुरक्षितपणे त्याच्या स्वाधीन व्हावेत, यासाठी सर्वांनी दक्ष राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शासकीय बांधकामांच्या गुणवत्तेबाबतही डॉ. सामंत यांनी कठोर भूमिका मांडली. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन प्रत्येक बांधकाम दर्जेदार झाले पाहिजे, असे स्पष्ट करत निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधित कामाची तात्काळ सखोल चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी प्रास्ताविकातून पुनर्वसन प्रकल्पाची पार्श्वभूमी मांडली. आमदार शेखर निकम यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, तहसीलदार प्रवीण लोकरे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रकल्पग्रस्त कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





