गुहागर : जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमाराच्या घटनेने देशभरात संताप व्यक्त होत असतानाच, या आंदोलनाच्या काळात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुहागरमध्ये ‘आम्ही गुहागरकर’ या बॅनरखाली श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सोमवार, २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुहागर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
याबाबतची माहिती रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी झालेल्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी तसेच आंदोलनात प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने मान्य केल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या संघर्षाला मानवंदना देणारा आणि समाजाच्या एकजुटीचे प्रतीक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या श्रद्धांजली कार्यक्रमात गुहागर तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, पालक, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांप्रती समाजाची सामूहिक बांधिलकी आणि एकात्मता या माध्यमातून अधोरेखित केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी समाज एकसंघ असल्याचा ठाम संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल या कार्यक्रमातून सरकारचे आभारही मानण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या संघर्षाला मानवंदना देतानाच त्यांच्या प्रश्नांबाबत समाजाची भूमिका आणि एकजूट अधोरेखित करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे.
रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेला मनसे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, ॲड. संकेत साळवी, सुरेश सावंत, असीम साल्हे, अमिष कदम यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
जंतर-मंतर आंदोलनातील विद्यार्थ्यांना आज गुहागरात श्रद्धांजली; ‘आम्ही गुहागरकर’ बॅनरखाली नागरिकांची एकजूट
Leave a Comment





