गोपाळगड किल्ला लवकरच होणार पूर्णपणे शासकीय अखत्यारीत; भूसंपादनाच्या प्रक्रियेला अधिकृत प्रारंभ

Gramin Varta
111 Views

गुहागर: तालुक्यातील ऐतिहासिक आणि राज्य संरक्षित स्मारक असलेल्या गोपाळगड (अंजनवेल) किल्ल्याचा खासगी जागेबाबतचा वाद आता कायमस्वरुपी संपुष्टात येणार आहे. खासगी जमीन मालकीमुळे पर्यटकांना येणाऱ्या अडथळ्यांची गंभीर दखल घेत पुरातत्व विभागाने हा किल्ला पूर्णपणे शासकीय अखत्यारीत आणण्यासाठी अधिकृत भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे पर्यटकांसह इतिहासप्रेमींमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

गुहागरच्या अंजनवेल किनारपट्टीवर वसलेला हा सागरी किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. मात्र, किल्ल्याचा काही भाग खासगी मालकीच्या जागेत असल्याने तेथे भेट देणाऱ्या पर्यटकांना स्थानिक जमीन मालकांकडून असभ्य वर्तनाला आणि नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. या वादाचे पडसाद समाजमाध्यमासह स्थानिक पातळीवर उमटले होते. गोपाळगड हा राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाकडून राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेला आहे. नियमांनुसार अशा ऐतिहासिक स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना विनाअडथळा आणि मोफत प्रवेश मिळणे बंधनकारक आहे. खासगी मालकीच्या हक्कामुळे किल्ल्याचे संवर्धन आणि पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात आली होती.

यावर प्रशासनाने अखेर भूसंपादनाचा कायदेशीर मार्ग अवलंबून काढण्याचे पाऊल उचलले आहे. तटबंदी दुरुस्तीसह सोयी-सुविधा मिळणार आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच गोपाळगड किल्ल्याची जागा अधिकृतपणे शासनाच्या नावावर हस्तांतरित होणार आहे. त्यानंतर पुरातत्व विभागामार्फत किल्ल्याच्या ढासळलेल्या तटबंदीची दुरुस्ती, मुख्य प्रवेशद्वाराचे जतन, माहिती फलक आणि पर्यटकांसाठी आवश्यक प्राथमिक सुविधा तातडीने उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन वेगाने होण्यास मदत होणार आहे. गेले कित्येक वर्ष रखडलेली गोपाळगड किल्ल्याची अंतिम भूसंपादनाची प्रक्रिया अखेर पूर्णत्वाला जात आहे ही सबंध इतिहास प्रेमी व दुर्गप्रेमींसाठी आनंदाचे बाब आहे तथापि भूसंपादनाची अंतिम प्रक्रिया राबवत असताना तथाकथित जमीन मालकांना शासनाकडून जो मोबदला दिला जाणार आहे ती मोबदल्याची रक्कम देखील शासनाने आधी जाहीर करावी.

गोपाळगड किल्ला संपूर्णपणे शासनाच्या ताब्यात आल्यानंतर, पुरातत्व विभागाने, गोपाळगडाची तुटलेली तटबंदी, मुख्य प्रवेशद्वार हे सुस्थितीत आणण्यासाठी आणि गोपाळगडाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्राधान्यक्रम द्यावा, अशी प्रतिक्रिया ॲड.संकेत साळवी संस्थापक अध्यक्ष, शिवतेज फाउंडेशन गुहागर यांनी दिली आहे.

Total Visitors :
4590859
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *