रत्नागिरी : नाटे येथील ‘यश होम स्टे’च्या पाठीमागील परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी रोशन मोठाभाऊ बच्छाव (वय २७) हे सध्या नाटे येथे प्रोजेक्ट सुपरवायझर म्हणून कार्यरत असून श्री. शहाणे यांच्या घरी भाड्याने राहतात. ४ ते ५ मार्च २०२६ दरम्यान ते कामानिमित्त बाहेर असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खोलीच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बॅगेत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत २८ जुलै २०२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथून विकास टीपू पवार (वय २३, मूळ रा. निगडी बुद्रुक, ता. जत, जि. सांगली) आणि संपत बिल्लू पवार (वय २०, मूळ रा. हुबनूर, जि. विजापूर, सध्या रा. निगडी बुद्रुक, ता. जत, जि. सांगली) या दोघांना ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत दोन्ही आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले १ लाख ९१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी नाटे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या सूचनेनुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, योगेश नार्वेकर आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
नाटे येथील घरफोडीचा गुन्हा उघड; एलसीबीची कारवाई, सांगलीतील दोन आरोपी अटकेत
Leave a Comment






