रत्नागिरी: रत्नागिरी पोलीस दलाने तपास प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत गुन्हे तपासाची गुणवत्ता, अचूकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. याच अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने विकसित केलेल्या ‘अधिनिर्णय’ या एआय-आधारित नाविन्यपूर्ण ॲपचे उद्घाटन २९ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून व दूरदृष्टीतून हे ॲप विकसित करण्यात आले आहे.
‘अधिनिर्णय’ हे ॲप पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी तपास प्रक्रियेत एक प्रभावी डिजिटल सहाय्यक म्हणून कार्य करणार आहे. पोलीस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या तपासकामात राहिलेल्या त्रुटी निदर्शनास आणून देत तपासाची गुणवत्ता व प्रगती अधिक प्रभावी करण्यास हे ॲप सहाय्य करणार आहे. तसेच तपास कामातील अपूर्ण बाबी अथवा आवश्यक कायदेशीर व प्रक्रियात्मक मुद्दे यांची ओळख करून देत हे ॲप तपासाच्या दृष्टीने पोलिसांना अधिक सक्षम करण्यास मदत करणार आहे.
‘अधिनिर्णय’ या ॲपची निर्मिती हे रत्नागिरी पोलीस दलाच्या तंत्रज्ञानाभिमुख, आधुनिक आणि नाविन्यपूर्ण पोलीसिंगच्या दिशेने टाकलेले अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पोलीस तपास अधिक सक्षम, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीना यांनी रत्नागिरी पोलीस दलाच्या या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. तसेच एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून तपास प्रक्रियेत गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या या प्रयत्नांना त्यांनी विशेष स्फूर्ती दिली.





