संगमेश्वर: तालुक्यातील कुरधुंडा गावमळ्यात आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास एका शेतकऱ्याला बिबट्या मादी आपल्या दोन पिल्लांना दुग्धपान करताना दिसल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली, मात्र तोपर्यंत बिबट्या मादी आपल्या पिल्लांसह जंगलात पसार झाली होती.
कुरधुंडा येथील शेतकरी सतीश धुमक हे आज सकाळी आपल्या शेतात भाजी काढण्यासाठी गेले असता, त्यांना अचानक एक बिबट्या मादी बसलेली दिसली आणि तिची दोन पिल्ले तिच्या जवळ दुग्धपान करत होती. बिबट्याला इतक्या जवळ पाहून सतीश धुमक यांची चांगलीच बोबडी वळाली. त्यांनी तात्काळ तेथून धाव घेत गावचे माजी सरपंच जमुरतभाई अलजी आणि उपसरपंच तैमूर अलजी यांना या घटनेची माहिती दिली.
माजी सरपंच जमुरतभाई अलजी आणि उपसरपंच तैमूर अलजी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वन विभागाला याची कल्पना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आपल्या टीमसह कुरधुंडा गावमळ्यात दाखल झाले. मात्र, वन विभागाची टीम पोहोचेपर्यंत बिबट्या मादी आपल्या पिल्लांसह सुरक्षितपणे जंगलात निघून गेली होती.
बिबट्या आणि तिची पिल्ले नैसर्गिक अधिवासात असल्याने वन अधिकाऱ्यांनी पिंजरा लावला नाही किंवा त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला नाही. वन विभागाने ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, भविष्यात अशी कोणतीही घटना निदर्शनास आल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे.
या घटनेप्रसंगी तैमूर अलजी आणि जमुरतभाई अलजी यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे कुरधुंडा गावच्या ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या वेळीच दिलेल्या माहितीमुळे वन विभागाला योग्य ती कार्यवाही करता आली.