GRAMIN SEARCH BANNER

धुक्याचा अंदाज न आल्याने माचाळच्या दरीत कोसळली कार; सुदैवाने जीवितहानी टळली

लांजा (प्रतिनिधी): तालुक्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माचाळ येथील रिव्हर्स फॉल परिसरात मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. दाट धुक्याचा अंदाज न आल्याने एक इर्टिगा कार सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघाताच्या वेळी गाडीत तीन महिला आणि एक पुरुष असे एकूण चार जण होते. कार दरीत कोसळल्यानंतर तात्काळ त्यांनी स्थानिक माचाळ ग्रामस्थांशी संपर्क साधून मदतीची याचना केली. मात्र अंधारामुळे त्या रात्री गाडी बाहेर काढणे शक्य झाले नाही.

दुसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवार, २७ ऑगस्ट रोजी अपघातग्रस्त वाहन बाहेर काढण्यासाठी क्रेन मशीनची मदत घेण्यात आली. परंतु, दरीतील निसरड्या चिखलामुळे क्रेन मशीन स्वतःच तिथे अडकून पडली. यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली. अखेर, जेसीबी मशीनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार बाहेर काढण्यात यश आले. गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी उशिरापर्यंत अडकलेली क्रेन मशीन बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

ही अपघातग्रस्त इर्टिगा कार देवरुख येथील असल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे तालुक्यात माचाळ येथील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माचाळ येथे वाहने पार्किंगसाठी सूचना फलक असतानाही काही पर्यटकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अशा दुर्घटना घडतात, त्यामुळे या पर्यटनस्थळाच्या नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

Total Visitor Counter

2475547
Share This Article