चिपळूणमध्ये कार थेट शिवनदीपात्रात कोसळली; सुदैवाने चालक बचावला

Gramin Varta
415 Views

चिपळूण : शहरातील भाजी मंडईच्या पाठीमागील परिसरात रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. कार रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती थेट शिवनदीपात्रात जाऊन कोसळली. सुदैवाने, नदीपात्रात पाण्याची पातळी कमी असल्याने चालक बचावला असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने सदर कार नदीपात्रातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली.

या घटनेमुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. चिपळूण नगरपालिकेने नदीपात्रात संरक्षण भिंत उभारली आहे, मात्र ही भिंत जिथे संपते, त्याच भागात ही दुर्घटना घडल्याने आता उर्वरित भागातही संरक्षक भिंत उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, संबंधित चालकाने कोणतीही तक्रार न दिल्याने चिपळूण पोलीस ठाण्यात या घटनेची कोणतीही अधिकृत नोंद करण्यात आलेली नाही.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *