रत्नागिरी : रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या १४ रुग्णालयांना दणका; घेतलेली रक्कम केली परत

Gramin Varta
163 Views

महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत योजनेवर जिल्हा सनियंत्रण समितीची करडी नजर

रत्नागिरी : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ पात्र व गरजू रुग्णांना कोणत्याही अडथळ्याविना मिळावा, यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या योजनेंतर्गत रुग्णांकडून अतिरिक्त रक्कम आकारणे, कॅशलेस उपचारास नकार देणे अथवा उपचारात दिरंगाई करणे यासारख्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या कारवाईमुळे आतापर्यंत १४ रुग्णालयांनी रुग्णांकडून घेतलेली रक्कम परत केली आहे.

योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राहावी आणि पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही दक्षता यंत्रणा कार्यरत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहत असून, जिल्हा आरोग्य अधिकारी, अंमलबजावणी सहाय्य संस्थेचे जिल्हा प्रमुख, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जिल्हा समन्वयक, भारतीय वैद्यकीय परिषदेचे प्रतिनिधी तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचा समितीत समावेश आहे. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाच्या शिफारसीनुसार मारुती गोविंद आंब्रे आणि दत्तात्रय पांडुरंग चाचले या दोन ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधींचाही समितीत समावेश करण्यात आला आहे.

योजनेची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत पोहोचते आहे की नाही, याचा नियमित आढावा समितीकडून घेतला जातो. दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेऊन अंगीकृत रुग्णालयांच्या कामकाजाची तपासणी केली जाते. योजनेच्या नियमांचे उल्लंघन, रुग्णांना निकृष्ट सेवा किंवा फसवणूक होत असल्याचे आढळल्यास संबंधित रुग्णालयाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची भूमिका समितीने घेतली आहे. आवश्यकतेनुसार संबंधित रुग्णालयाचे तात्पुरते निलंबन अथवा अंगीकरण रद्द करण्याची शिफारस राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे केली जाऊ शकते.

दरम्यान, योजनेशी नवीन रुग्णालये जोडताना त्यांच्या पात्रतेची आणि उपलब्ध सुविधांची काटेकोर तपासणी केली जाते. तसेच अंगीकृत रुग्णालयांमध्ये रुग्णांना कॅशलेस उपचार मिळत आहेत का, औषधे किंवा इतर उपचारांसाठी अनावश्यक अतिरिक्त खर्च लादला जात आहे का, यावरही समिती लक्ष ठेवत आहे. रुग्णांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचे तातडीने निवारण करण्यावर भर देण्यात येत आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेंतर्गत पात्र रुग्णांना दाखल होण्यापासून डिस्चार्जपर्यंत नियमानुसार कॅशलेस उपचार मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात पैशांची मागणी केली जात असल्यास किंवा योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्यास रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात आरोग्यमित्राची सुविधा उपलब्ध असून, त्यांच्याशी संपर्क साधता येतो. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा रुग्णालयातील जिल्हा समन्वयकांशीही थेट संपर्क साधता येणार आहे.

योजनेशी संबंधित तक्रारींसाठी २४ तास सुरू असलेल्या १४५५५, १८०० २३३ २२० आणि १५५३८८ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. तसेच www.jeevandayee.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरही माहिती व तक्रारीची सुविधा उपलब्ध आहे.

गरजू रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या किंवा शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही रुग्णालयाची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. रुग्णांकडून घेतलेली रक्कम परत करण्यास १४ रुग्णालयांना भाग पाडण्यात आल्याने जिल्हा सनियंत्रण समितीच्या दक्ष भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले असून, योजनांच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेबाबत रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

Total Visitors :
4820634
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *