GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : निवळी येथे बँकेने सीलबंद केलेल्या मालमत्तेचे सील तोडून वास्तव्य केल्याप्रकरणी दाम्पत्याविरोधात गुन्हा

Gramin Varta
425 Views

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी रावणंगवाडी येथे बँक ऑफ महाराष्ट्र, खेडशी शाखेच्या मालकीच्या सीलबंद मालमत्तेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याप्रकरणी एका दाम्पत्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फौजदारीपात्र अतिक्रमणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ डिसेंबर २०२३ ते १९ सप्टेंबर २०२५ या प्रदीर्घ कालावधीत घडल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र, खेडशी शाखेचे व्यवस्थापक रवीकुमार दादाभाऊ लोहकरे (वय ४०, रा. हिंद कॉलनी, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. निवळी रावणंगवाडी येथील सर्वे नंबर/हिस्सा नंबर ९४९/३/२, क्षेत्र ०.३०.०० या मिळकतीवर बँकेचे मालकी हक्क असून, ही मालमत्ता मंडल अधिकारी, तरवळ यांच्याकडून सीलबंद करून बँक ऑफ महाराष्ट्रच्या ताब्यात देण्यात आली होती. मात्र, या परिसरातील रहिवासी असलेले हंबीरराव सावळा गोसावी आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सविता हंबीरराव गोसावी (रा. घर नं. १२८/१, मु.पो. निवळी रावणंगवाडी, ता.जि. रत्नागिरी) या दाम्पत्याने सदर मिळकतीला लावलेले सील तोडले. सील तोडून त्यांनी बेकायदेशीरपणे या मिळकतीवर अतिक्रमण केले आणि तेथे निवास करत आहेत.

या गंभीर प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर बँक व्यवस्थापक रवीकुमार लोहकरे यांनी आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी या फिर्यादीवरून दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी १९.३८ वाजता (सायंकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी) गुन्हा नोंदवला आहे. एम.आर. क्र. १८९/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२९ (४) प्रमाणे गोसावी दाम्पत्यावर फौजदारीपात्र अतिक्रमणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. बँकेच्या सीलबंद मालमत्तेवर थेट अतिक्रमण झाल्याने हा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Total Visitor Counter

3199309
Share This Article