रत्नागिरी: जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी महाराज यांच्या उदात्त प्रेरणेतून, त्यांच्या शिष्यपरिवारातील कै. सौ. भारती सुभाष डुबल (वय ६०, रा. नाणीज, रत्नागिरी) यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे दि. १७/१०/२०२५ रोजी करण्यात आले. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे दान संस्थेचे १२ वे देहदान ठरले, ज्यामुळे मृत्यूनंतरही समाजोपयोगी कार्य करण्याची भावना समाजात दृढ झाली आहे.
नाणीज येथील रहिवासी असलेल्या कै. सौ. भारती डुबल यांचे दि. १६/१०/२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. या दुःखाच्या प्रसंगीही त्यांच्या कुटुंबियांनी दाखवलेल्या मोठ्या मनाने आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून, त्यांचे पार्थिव देह वैद्यकीय महाविद्यालयाला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वैद्यकीय संशोधनाला आणि नवीन डॉक्टरांच्या निर्मितीला मोलाची मदत होणार आहे.
कै. श्रीमती डुबल यांच्या पश्चात त्यांचे पती श्री. सुभाष डुबल, मुलगा श्री. हेमंत डुबल, मुलगी प्रतिभा घाडगे, जावई प्रशांत घाडगे, सून पूजा डुबल व नातू शिवांश डुबल असा मोठा परिवार आहे. देहदानप्रसंगी त्यांचे पती श्री. सुभाष डुबल, मुलगा श्री. हेमंत डुबल व अन्य नातेवाईक उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या सदस्याच्या या उदात्त निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले.
देहदानप्रसंगी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी महाराजांच्या रामानंद संप्रदायाचे पदाधिकारी श्री. संदीप नार्वेकर, श्री. मुन्ना साळवी, श्री. नितीन रामेकर, श्रीमती मनिषा रामेकर, श्रीमती अनिता जाधव आणि श्रीमती रेश्मा दरडी आदींनी उपस्थित राहून या महान कार्यात सहभागी कुटुंबाला आधार दिला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद यांनी महाविद्यालयाच्या वतीने हा देह स्वीकारला. यावेळी डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक श्री. रेशम जाधव, शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, कर्मचारी मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे आणि रुग्णवाहिका चालक मयेकर व झोरे यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले.
कै. सौ. भारती डुबल यांच्या या देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानवी शरीररचनेचा सखोल अभ्यास करणे शक्य होणार आहे. त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या या धाडसी आणि प्रेरणादायी निर्णयाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. मृत्यूनंतरही दुसऱ्यांसाठी उपयोगी पडण्याची ही भावना निश्चितच इतरांना देहदानासाठी प्रेरित करेल.